पुणे - भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पुणे पदवीधरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गणपती लाड हे विजयी झाले आहेत. अरुण लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे.
पुणे पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी पुण्यातल्या बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरू झाली होती. मतपत्रिकांच्या छाननीनंतर झालेल्या मतमोजणीत आज शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गणपती लाड यांनी विजय मिळवला.
अरुण लाड यांचा मतांचा कोटा पूर्ण -
अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपाचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. विजयासाठी 1 लाख 14 हजार 137 इतक्या मतांचा कोटा होता, लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतामध्येच हा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. अरुण लाड यांचा हा विजय पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठा धक्का आहे.
भाजपाला धक्का -
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, लाड यांच्या दणदणीत विजयाने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच प्रवेश करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष -
महाराष्ट्रातल्या सध्या झालेल्या पदवीधर निवडणूकमध्ये पुणे पदवीधर निवडणुकीकडे प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिले जात होते. दरम्यान अरुण लाड यांच्या या विजयानंतर पुण्यातल्या बालेवाडी इथल्या मतदान मतमोजणी केंद्राबाहेर लाड यांच्या समर्थकांनी सकाळीच मोठा जल्लोष केला. यावेळेस गुलाल उधळत लाड यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या या मोठ्या यशानंतर अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा -मराठवाडा पदवीधर निवडणूक; महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची हॅट्रिक