पुणे - पार्थ पवार यांचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर नवणीत राणा यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, फोटो व्हायरल करणे किंवा ट्रोल करण्याने काही होत नाही. ज्याच्यात दम आहे, तोच निवडून येणार. कोणात किती दम आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल'
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या मतदारसंघात आपलाच विजय व्हावा, यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार प्रयत्नशिल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सध्या राज्यभरातील स्टार प्रचारक मावळमध्ये फिरवण्याचे सत्र राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले आहे. शनिवारी अमरावती लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा या कडक उन्हात पार्थ पवार यांचा प्रचार करत होत्या.
मावळ लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे मुख्य नेते मावळात ठाण मांडून आहेत. शनिवारी नवनीत कौर राणा यांनी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सुरुवात केली. सूर्य आग ओकत असताना, तापमान हे ४१ अंशाच्या पुढे गेले असून अशा उन्हात नवनीत कौर राणा पार्थ अजित पवार यांच्यासाठी पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.