पुणे - गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने गॅसच्या किंमतीत रुपयाने वाढ होत असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यातील अलका चौकात केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गेल्या दोन महिन्यांपासून गॅस, तसेच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महिलांचा आर्थिक ताळेबंद या दरवाढीमुळे कोलमडला आहे. पुन्हा चूल सुरू करायची की काय, अशी परिस्थिती महिलांची झाली आहे. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधानांनी सांगितले होते की, कोणत्याही जीवनावश्यक वस्तूच्या दरामध्ये वाढ करणार नाही. पण असे सांगितले असतानाही सातत्याने गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. ही दरवाढ आम्हा महिला-भगिनींसाठी आर्थिक ताळेबंद कोसळवणारी आहे. म्हणून आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. लवकरच ही दरवाढ कमी नाही केली तर, यापुढे राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असे यावेळी शहराध्यक्ष स्वाती पोकळे म्हणाल्या.
अन्यथा जनता जागा दाखवेल
केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ कमी करावी. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात तरी जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवायला हवे. दरवाढीने महिलांसाठी घरखर्च चालवणे कठीण होत आहे. केंद्र सरकार फक्त घोषणा करत आहे. प्रत्यक्षात तर काहीच करत नाही. केंद्र सरकार अनेक अन्यायकारक भूमिका घेत असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस याचा विरोध करत आहे. केंद्राने ही दरवाढ कमी केली नाही तर, येणाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही पोकळे म्हणाल्या. यावेळी आंदोलक महिलांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.