पुणे - राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमागचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या घटनेमुळे क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, घटनेच्या संभाव्य कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साहिलचे वडील त्यांच्या कार्यालयात असताना त्यांनी साहिलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अनेकदा संपर्क करूनही साहिलने त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे त्याचे वडील कार्यालयातून घरी पोहोचले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या, की शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागचे नेमके कारण समजू शकेल.