पुणे(आळंदी) - कोरोनाची दुसरी लाट येत असताना अलंकापुरीमध्ये कार्तिकवारीचा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. अशात भाविक व वारकऱ्यांमध्ये कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कार्तिकीवारी निमित्ताने आळंदीमध्ये बाहेरील दिंड्या येऊ नये व संजीवन समाधी सोहळ्या दरम्यान कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिका स्वागतार्थ आहेत. कार्तिकीवारी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज(शनिवार) आळंदी येथे दिल्या.
आपली सेवा घरातूनच समर्पित करा
आळंदी व पंढरपूर ही दोन्ही ठिकाणे आपल्या राज्याचे वैभव आहेत. मात्र, यंदा आषाढी व कार्तिकी वारी दरम्यान कोरोना महामारीचे मोठं संकट वारकरी संप्रदायावर आले आहे. या संकटाला खचून न जाता कार्तिकीवारी सोहळा होत असताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी पंढरपूरच्या धरतीवर आळंदीतील कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा पार पाडला जावा, वारकरी संप्रदायातील भाविक, भक्त, वारकरी हे राज्य व परराज्यातून संजीवन समाधी सोहळ्यात सहभागी होत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या संकटाची दुसरी लाट येत असताना राज्यातील व राज्याबाहेरील दिंड्या व वारकऱ्यांनी आळंदीत न येता आपली सेवा घरातूनच समर्पित करावी जेणेकरून संजीवन समाधी सोहळा होत असताना कोरोनाचा समूह संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी परभणीचे खासदार संजय जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे पाटील, योगेश देसाई उपस्थित होते.
पवित्र इंद्रायणी गटारगंगा
आळंदीमधून वाहणारी इंद्रायणी नदी गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाण्याने वाहत आहे. इंद्रायणीचे पावित्र्य कारखानदारी व वाढते शहरीकरण यामुळे झाले आहे. इंद्रायणीचे पवित्र जोपासण्यासाठी ती स्वच्छ कशी राहील यासाठी लवकरच सर्व विभागाचे अधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, नगरपालिका प्रतिनिधी यांची बैठक घेऊन इंद्रायणीच्या झालेल्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून इंद्रायणी स्वच्छ करण्याचे अभियान वेगाने राबवणार असून, याबाबत मुख्यमंत्री व संबंधित यंत्रणांना इंद्रायणीच्या व्यवस्थेबाबत सूचना देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. त्यांनी आज संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पवित्र इंद्रायणी नदीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.