पुणे - राज्यसभेत मंगळवारी मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विरोधातील विधेयकाचे पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी तिहेरी तलाक विरोधातील विधेयकाचे स्वागत केले. ते म्हणाले यासोबतच बहुपत्नीत्व आणि हलाला सारख्या प्रथेवरही बंदी घालणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
तिहेरी तलाक विरोधातील विधेयक मंजूर झाल्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांचे सर्वच प्रश्न सुटणार नसले तरी हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून पडलेले एक महत्वपूर्ण पाऊल म्हणता येईल. शासनाने आणखी एक पाऊल पुढे जात धाडस दाखवून तलाकचे इतर प्रकार तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन की ज्यामुळे मुस्लिम पुरुष घरात बसून पत्नीला तलाक देऊ शकतो, अशा प्रकारच्या न्यायालयाबाहेर होणाऱ्या तलाकवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच ज्याला तलाक घ्यायचा आहे, त्याने न्यायालयीन मार्गानेच तो मिळवला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका घेणे गरजेचे होते, अशी भुमिका प्रा. तांबोळी यांनी 'ई टीव्ही भारत'च्या माध्यमातून मांडली.
जेव्हा एखादा पुरुष तलाक देतो आणि त्याला तो तलाक मागे घ्यायचा असतो अशावेळी त्याला हलालासारख्या प्रथेला तोंड द्यावे लागते. हलाला ही प्रथा मुस्लिम बहिणींना मानसिक यातना देणारी आहे. त्यामुळे शासनाला एकाचवेळी तलाक, बहुपत्नीत्व आणि हलाला सारख्या तीनही प्रथांवर बंदी घालून मुस्लिम महिलांना न्याय देण्याची मोठी संधी होती.
तलाकवर बंदी घालताना बहुपत्नीत्ववर बंदी घालणेसुद्धा तितकेच गरजेचे होते. कारण एखादा पुरुष तलाक न देता मुस्लिम धर्मात मुभा असल्यामुळे दुसरे लग्न, तिसरे लग्न करू शकतो. म्हणून तलाकवर बंदी घालत असताना बहुपत्नीत्वावर बंदी घालणेही तेवढेच महत्वाचे होते, असे ताबंळी म्हणाले.
जेव्हा जेव्हा एखादा पुरोगामी कायदा येत असतो, तेव्हा त्याला विरोध होत असतो. या विधेयकाच्या बाबतीतही तेच होत आहे. या विधेयकाचा दुरुपयोग होत असल्यास, मुस्लिम पुरुषांना याद्वारे टार्गेट केले जात असल्याचे दिसून आल्यास या विरोधात आवाज उठवता येईल. पण, आत्ताच या विधेयकाला विरोध दर्शविणे हे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण असेल, असेही ते म्हणाले.