पुणे - मुस्लिम समाजातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला सण म्हणजे ‘शब-ए-बारात’. हा सण मुस्लिम समुदायात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या 8 तारखेला हा सण साजरा करण्यात येणार आहे. पण, यंदा हा सण सर्व मुस्लिम समुदायातील नागरिकांनी घरातच साजरा करावा, असे आवाहन शिया मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबीह अहसन काझमी यांनी केले आहे.
जगात कोरोना विषाणूंच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या देशातही दिवसंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात सर्व धर्मीय नागरिक एकत्र येत कोरोनाचा मुकाबला करत आहे. अशा या काळात आपणही आपल्या प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करत शब-ए-बारात हा सण घरीच साजरा करावा व देशाला एकात्मतेचा संदेश द्यावा. कोणीही या दिवशी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ही मौलाना शबीह अहसन काझमी यांनी केले आहे.