पुणे : म्हणतात ना 'पुणे तिथे काय उणे' आणि याच पुण्यात अनेक व्यक्ती हे व्यासंगाने झपाटलेली होती आणि आजही आहेत. या सर्वांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे एकहाती ध्येयपूर्ती करण्याची विलक्षण क्षमता जिद्द आणि कष्ट याच्या जोरावरच महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. डॉ. केतकरांचा बावीस खंडातील महाराष्ट्रीय ज्ञानकोश प्रसिद्ध होऊ शकला. केळकर संग्रहालय उभे राहू शकले, याच परंपरेतील बाळकृष्ण शंकर उर्फ भाऊ जोशी होते. भाऊ जोशींना लहानपणापासूनच रेल्वेची इंजिने आणि रेल्वेचे डबे जमवायचा छंद होता. त्यांनी दिवाळीत केलेले किल्लेसुद्धा हे हलत्या देखाव्याचे असत, प्रमाणबद्ध असत. लहानपणीचा छंद साधारणपणे थोडे प्रौढ झाल्यावर बंद होतो, असे म्हणातात. याला भाऊ जोशी हे अपवाद होते. रेल्वेचा महानपणीचा छंद जीवनध्यास झाला व हाच ध्यास संग्रहालयाच्या रूपाने पुढे पुणेकरांचा चिरंतन ठेवा झाला.
अशी झाली या संग्रहालयाची सुरवात : भाऊ जोशी पुण्यातील इंजिनीरिंग कॉलेज मध्ये शिकत असताना, त्यानी रेल्वे इंजिनाचे एक मॉडेल केले होते. ते पाहून कै. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्यांचे कौतुक केले होते. ज्या काळात परदेशातील हालती खेळणी तसेच रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती आयात करता येत नव्हत्या. त्या काळात भाऊ जोशींनी मोठ्या प्रयत्नांने अशी रेल्वे इंजिने मिळवली. स्वतः इंजिनीयर असल्यामुळे त्या इंजिनांची जडणघडण आणि कार्यपद्धती भाऊनी अभ्यासली. पुढे शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने भाऊंना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. इंग्लंड मधील वास्तव्यात भाऊंनी शिक्षणाबरोबरच रेल्वे प्रतिकृतींचा छंदही जोपासला. तेथील रेल्वे संग्रहालयांना भेटी दिल्या. रेल्वे प्रतिकृतीच्या संग्राहकांशी संपर्क करून; त्यांच्या कडील रेल्वे इंजिने जवळून पहिली. तसेच इंजिने स्वतः च्या संग्रहासाठी मिळवली. इंग्लंडहून परत आल्यावर रेल्वे इंजिनाच्या संग्रहातून मिळणारा आनंद इतरांच्या वाट्यालाही यावा म्हणून त्यांचे प्रदर्शन भरवावे असे त्यांच्या मनात आले. ही कल्पना १९८२ मध्ये त्यांनी पुण्यातील गोखले हॉल येथे प्रदर्शन भरवून प्रत्यक्षात आणली. या प्रदर्शनातील लहान मुलांबरोबर मोठ्यांनी लावलेली हजेरी भाऊंचा उत्साह द्विगुणित करून गेली. या यशाच्या जोरावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शने भरवून त्यांनी 1998 साली त्याच संग्रहालय सुरू केलं.
असं आहे काल्पनिक शहर : भाऊ जोशी यांच्या निधनानंतर आत्ता त्यांचे पुत्र रवी जोशी हे हा संग्रहालय चालवतात. या संग्रहालयाला राज्यातील अनेक पर्यटक भेट देत असतात. दर आर्ध्या तासाला 25 मिनिटांचा शो असतो. यात छोटे शहर आणि त्यात रेल्वेच्या निरनिराळ्या प्रतिकृती आहेत. वाफेवरची आगगाडी डिझेलवर चालणारी रेल्वेगाडी वेगवान इंटरसिटी एक्सप्रेस लोकल शटल ट्रेन हँगिंग मोनोरेल, रोप-रेल्वे या प्रतिकृती तसेच आकर्षक साऊंड सिस्टिम त्यावर चालू बंद होणाऱ्या छोट्या मोठ्या लाईटी लहान आणि मोठ्या मुलांचं लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे या काल्पनिक शहरात वेगवेगळ्या रेल्वेगाडय़ा पाहत केल्या जाणाऱ्या भ्रमंतीला एका रंजक गोष्टीत गुंफले आहे. रेल्वेगाडय़ांबरोबर टॉवरवरचे वर-खाली होणारे हलते उपाहारगृह सर्कसचा छोटा हलता सेट या गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या आहे. त्याबरोबर ज्या दिवशी देशात पहिली पॅसेंजर रेल्वेगाडी धावली त्या रात्री (म्हणजे १६ एप्रिल १८५३ रोजी) आकाशात असलेले ग्रहताऱ्यांचे मनोहर दृश्य या शहराच्या छतावर साकारले आहे.
छंद देशातही रुजावेत : सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे संग्रहालय सुरू असतं, तसेच शनिवार आणि रविवारी संध्याकाळी पाच नंतर हे संग्रहालय सुरू असतं. या संग्रहालयाला मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह मोठ्या व्यक्ती देखील भेट देत असतात आणि एका या काल्पनिक शहराचा आनंद घेत असतात. विशेष म्हणजे या संग्रहालयातूनच गेल्या दहा वर्षांत जोशींचा रेल्वेच्या लहान प्रतिकृती बनवण्याचा व्यवसाय विकसित झाला आहे. त्यांनी रेल्वेला अनेक प्रतिकृती तयार करुन दिल्या आहेत. तसेच, असेच अनेक छंद तरुण पिढी मध्ये आणि येणाऱ्या पिढी मध्ये रुजावेत, अशी अपेक्षा संग्रहालय निर्माता रवी जोशी यांनी व्यक्त केली.