पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड परिसरात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती. हबीदा शेख (वय- ४५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर करीम शाह अहमद शेख (वय-६४) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरात करीम आणि हबिदा राहात होते. परंतु, दोघांचा विवाह दुसरा असल्याने त्यांचे पटत नव्हते. दरम्यान, हबीदाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन करीमने अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविवारी दोघांमध्ये वाद झाला. वादातून किरकोळ भांडण झाले. या भांडणात करीमने हबीदाच्या डोक्यात लोखंडी पट्टीने वार केले. हबीदाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर करीम हा फरार होता. त्याचा शोध देहूरोड आणि गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी करत होते.
आरोपीचे मुळगाव श्रीरामपूर येथील असल्याने त्या ठिकाणी व पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला. तेव्हा, खबऱ्या मार्फत युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना माहिती मिळाली की, आरोपी हा पुणे नगर रोडवरील रांजणगाव परिसरात फिरत आहे. त्यानुसार बाळकृष्ण सावंत यांनी पोलीस शिपाई भोसले आणि इतर कर्मचारी ताबडतोब शिक्रापूर येथून परिसरात रवाना झाले. पोलीस नाईक भोसले व त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिक मनोज कदम यांच्या मदतीने आरोपीला शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनंजय भोसले, गाडेकर, ठाकरे, बनसोडे, खेडकर, ईघारे, माने, फारूक मुल्ला, बहिरट, गुट्टे, जाधव, किरनाळे यांच्या पथकाने केली आहे.
करीमने आत्महत्येची पूर्व तयारी केली होती. त्याच्याकडे दोरी आणि सुसाईड नोट असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी युनिट ५ च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अटक केली.