पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षाची तोडफोड केल्यावरून जिमट्रेनरची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. प्रेम सायबू लिंगदाळे (२१) असे मृत जिमट्रेनर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवानंद शंकर हेवळे (२३) याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मॅडी मडीवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, योगेश फुरडे, दीपक कोल्हे, सागर परीट, अनंत साठे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी, किरण, दीपक आणि अनंत साठे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद आणि मृत प्रेम यांच्यासह इतर मित्रांनी आरोपी मॅडी मडीयाल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या रिक्षाची तोडफोड केली होती. त्यानंतर सर्वजण चिंचवड येथील बळवंतनगर येथे थांबले होते. तेव्हा, अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात मॅडी आणि त्याचे साथीदार राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, किरण चव्हाण, सागर परीट, दीपक कोल्हे, अनंत साठे हे चिंचवडमधील बळवंतनगर येथे दुचाकीवरून आले.
त्यांच्या हातात धारदार हत्यारे होती. ते पाहून फिर्यादी, मृत प्रेम यांच्यासह इतर सैरावैरा धावत सुटले. तेव्हा, प्रेम हा एकटा त्यांच्या तावडीत सापडला. आलेल्या तरुणांनी त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर प्रेम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तीन आरोपींना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.