दौंड (पुणे) - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे भविष्य विरोधक सांगत आहेत. त्यांना अशी स्वप्न पडत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. विरोधकांनी फक्त स्वप्न पहावीत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पाटस येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या .
याप्रसंगी सासवड पुरंदर चे आमदार संजय जगताप, दौंड चे माजी आमदार रमेश थोरात, प्रदीप गारटकर,आप्पासाहेब पवार , महेश पासलकर, अजित बलदोटा, वैशाली नागवडे, हरीश ओझा, आनंद पळसे, सारिका पानसरे, आशा शितोळे, राणी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की, सध्या विरोधक महाविकास आघाडीचे सरकार कसे पडेल यासाठी खटाटोप करत आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग होणार नाही. आघाडी सरकार पुढील पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
ही निवडणूक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आहे. त्यामुळे उच्चशिक्षित व स्वच्छ चरित्र असलेले उमेदवार महाविकास आघाडीने दिले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी मतदान करून बहुमताने निवडून द्यावे, असे आव्हान खासदार सुळे यांनी केले.