पुणे : लिंगायत समाजाचे प्रश्न मी गेले अनेक वर्ष सातत्याने संसदेमध्ये मांडत आहे. त्यांचे प्रश्न सोडवणे ही नैतिक जबाबदारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्याशिवाय दुसरा मोर्चा लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी, या लव्ह जिहादचा अर्थ मला माहित नाही. मला लव्हचा अर्थ कळतो. जिहादचा देखील अर्थ कळतो. पण लव्ह जिहादचा अर्थ कळत नाही, असे म्हटले.
शिवसेनेच्या चिन्हावर भाष्य : पुण्यात आज कात्रज येथे साई स्नेह हॉस्पिटल येथील कॉस्मेटीक सर्जरी शिबीराचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. उद्या निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की मी तर पहिल्याच दिवसापासून सांगत आहे की शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यांचे उत्तराधिकारी त्यांनी ठरवले आहेत. त्यामुळे त्यांनाच चिन्ह मिळायला हवे, असे यावेळी सुळे यांनी सांगितले.
शिवसेना-वंचित बहूजन आघाडीची युती : शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीच्या युतीबाबत विचारले असता पवार साहेब बोलले आहेत यावर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जेव्हा भेटतील त्यावेळी ही चर्चा होऊ शकते. कोणी काही प्रस्ताव आणला तर चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल. असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. पहाटेच्या शपथविधीवर विचारले असता त्या म्हणाल्या की तुमच्या चॅनलने खूप दाखविले आहे. सध्या देशासमोर महागाई बेरोजगारी असे गंभीर प्रश्न आहेत. आता बजेट सादर होणार आहे. बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना काय मिळणार आहे हे बघावे लागणार आहे. नारायण राणे हे म्हणत आहेत जूनमध्ये मंदी येणार आहे. त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाले.
पदवीधर निवडणूक : उद्या होणाऱ्या पदवीधर निवडणूकीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की पारदर्शकपणे निवडणूक व्हायला हवी. चुरशीची लढत होत आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी असेच असले पाहिजे असे देखील यावेळी सुळे यांनी सांगितले. तसेच सरकारबाबत विचारले असता सगळे दुर्दैवी आहेत. हे ईडी सरकार प्रशासनात कमी आणि चुकीची कामे जास्त करत आहेत. हे लोक मोदीजी यांचे भाषण ऐकत नाहीत. मोदीजी म्हणतात मी सेवक आहे. सेवा सोडून हे लोक सगळी कामे करतात, असा टोला देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.