पुणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले रुग्णालयातून बातमी प्राप्त झाली की, 'क्यज्युलिटी डिपार्टमेंट' येथील शौचालयाच्या मागील बाजूस एक नवजात अर्भक पडून आहे. अर्भक रुग्णालयात आणल्यावर तपासणी केली असता ते मृत आढळले. पोलीस चौकशी दरम्यान रुग्णालयात एक 19 वर्षीय महिला पाठदुखी आणि अशक्तपणामुळे भरती झाली होती. आरोपी महिलेला सलाईन लावून देखील ती अधून-मधून शौचालयात जात होती. असे तिने 3 ते 4 वेळा केले. ती सकाळी साडे दहाच्या सुमारास शौचालयात गेली आणि तब्बल 1 ते दीड तास बाहेरच आली नाही.
शौचालय तपासले अन् बालक आढळले: नर्स आणि डॉक्टरांनी महिलेला याविषयी विचारले असता तिला शौच होत नसल्याचे तिने सांगितले. दीड तासाने ती बाहेर आल्यानंतर तिला रक्तस्त्राव होत असल्याने तिचे कपडे खराब झालेले होते. यानंतर डॉक्टरांनी संबंधित महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले आणि सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या गर्भपिशवीचा आकार मोठा असल्याचे दिसले. यामुळे तिने बाळाला आताच जन्म दिल्याचे डॉक्टरांना कळाले; पण नवजात अर्भक कुठे जन्मले हे कळाले नाही. ही महिला ज्या वार्डमध्ये होती तेथील शौचालये ब्लॉक झाली होती. त्यांनी ती तपासली असता त्यांना त्यामध्ये नवजात बालक आढळून आले.
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल: डॉक्टरांना त्या आरोपी महिलेवर संशय आल्याने तिला विचारणा केली. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली गेली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंहगड रस्ता पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
17 मजल्यावरून बाळाला फेकले: मुंबईतील कांदिवली परिसरातील भारत हौसिंग सोसायटी इमारतीच्या 17 मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावलेल्या महिलेने तिच्या बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती.
अखेर त्या बाळाचा मृत्यू: कांदिवली परिसरातील भारत हौसिंग सोसायटी इमारतीच्या 17 मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने नुकताच बाळाला जन्म दिला होता. आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावलेल्या महिलेने तिच्या बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांना सूचना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत जखमी बाळाला नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबाची माहिती उघड केली नसून अधिक तपास सुरू आहे.