पुणे - सीलबंद पाण्याच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे बाहेरून विकत घेतलेले पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा प्रकार उघडकीस आणला. श्रीपाद ऑक्सिमिस्ट नावाने असलेल्या सीलबंद बाटलीतील पाण्यात त्यांना शेवाळ आढळले. हे पाणी एका दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. सीलबंद असलेल्या या बाटल्या दूषित पाण्याने भरलेल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
या सीलबंद पाण्याच्या बाटलीचे उत्पादन पिंपरी-चिंचवड शहरातील चिखलीमध्ये होत असल्याचा उल्लेख या बाटलीवर आहे. या बाटलीवर उत्पादनाची तारीख, आयएसओ मानांकन, अशी सर्व माहिती अगदी व्यवस्थित छापण्यात आली आहे. कुठेही, कोणतीही त्रुटी नाही. पण याच बाटलीच्या तळाशी शेवाळ साचल्याने सर्वांना धक्का बसला आहे.