मुंबई - गणेशोत्सवाचे औचित्य साधून कलाकार श्रुतिका शिर्के-घाग या तुरुणीने गणपती बाप्पाची अनोखी कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी तिने वेगवेगळ्या रंगांच्या कागदी फुलांचा वापर केला आहे. दहिसर येथे पुढील आठ दिवस ही कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
बोरिवलीत राहणाऱ्या कलाकार श्रुतिका शिर्के-घाग हिने तब्बल 36 हजार कागदी फुलांचा वापर करून गणरायाचे अनोखे मोझॅक पोट्रेट साकारले आहे. यात 6 रंगछटांचा वापर करण्यात आला आहे. 8 बाय 10 फुटाची कलाकृती असून अस्मिता संस्थेतील दिव्यांग महिला तसेच विविध क्षेत्रातील एकूण 13 कलाकारांचा यात सहभाग आहे. कोरोनामुळे यंदा गणोशोत्सव उत्साहात साजरा करता येणार नसल्याची खंत लोकांच्या मनात आहे. म्हणूनच, ही कलाकृती साकार करून गणरायाला मानवंदना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ती साकार करण्यासाठी त्रिभुवन धुरिया फाउंडेशन या सामाजिक संस्थेने आर्थिक सहकार्य केले आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी आम्हाला 40 तासांचा वेळ लागला आहे.
यंदा अत्यंत साधेपणाने गणेश उत्सव साजरा होणार आहे. लालबागच्या राजाचे दर्शन देखील भाविकांना घेता येणार नाही आहे. यामुळे मी या कलाकृतीत लालबागच्या राजाच्या प्रतिमेचा वापर केला आहे. यासाठी काही विशेष दिव्यांग कलाकारांचा सहभाग देखील मी करून घेतला आहे कारण, भविष्यात त्यांना कलेचा खूप उपयोग होईल. दहिसर उत्सव प्रतिष्ठान येथे ही कलाकृती लोकांना पाहता येणार आहे, असे श्रुतिकाने सांगितले.