पुणे - कोरोनाच्या प्रतिकारासाठी सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोविशिल्ड' लसीने भरलेले तीन कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. यानंतर आता आणखी तीन कंटेनर सीरम इन्स्टिट्युटमधून विमानतळाकडे रवाना होणार आहेत. ही लस १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणाऱ्या देशांतर्गत लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव रस्त्यावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देशभरामध्ये १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. यात सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशिल्ड ही लस दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सीरमशी करार केला आहे. यानुसार आज (मंगळवार) पहाटे ४.५० वाजता लसीने भरलेले तीन कंटेनर देशभरामध्ये वितरीत करण्यासाठी पाठवण्यात आले. आता दहा वाजण्याच्या सुमारास आणखी तीन कंटेनर विमानतळाकडे पाठवण्यात येणार आहेत. यावेळी सीरमचे कार्यालय ते विमानतळ या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली 'कोविशिल्ड' लस
ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोविड-१९ ही लस प्रोफेसर सारा गिल्बर्ट, अॅन्ड्र्यू पोलार्ड, तेरेसा लामबे, डॉ. सँडी डगलसस, कॅथरिन ग्रीन आणि अॅड्रीन हिल यांच्या नेतृत्वाखाली झाली. या पथकात ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचाही समावेश आहे, ज्यांनी २०१४ साली इबोला संसर्गावर लस निर्मितीत सहभाग घेतला होता. कोविशिल्ड ही लस पुण्यातील सीरम कंपनीत उत्पादित केली जात आहे. यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीचे सहकार्यही घेण्यात येत आहे.
इंग्लडमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि इंग्लमध्ये घेण्यात आली असून आता तेथेही लसीकरण सुरू आहे. सीरम लसीच्या तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून लस कार्यक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर भारत सरकारने आणीबाणीच्या काळात वापरासाठी लसीला परवानगी दिली आहे.
हेही वाचा - सीरममध्ये 'अशी' झाली तयार कोविशिल्ड लस
हेही वाचा - प्रतिक्षा संपली! नारळ फोडून लस पुणे विमानतळाकडे रवाना