पुणे - कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच शुक्रवारी शिरुरसह आंबेगाव आणि खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसाने शिरूरमधील मांडवगण फराटा परिसरात अनेकांची धांदल उडाली.
उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी संकटात सापडला असून पाण्यासाठी वणवण भटकंती करत असताना बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. अशात शुक्रवारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराज्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळला.
शिरूर तालुक्यातील मांडवगण परिसरात शुक्रवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात वरुणराजाचे आगमन झाले. त्यामुळे सध्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.