पुणे - राजधानी मुंबई वगळता राज्यात दरमहा सरासरी 7 ते 8 लाख मोबाईल विकले जातात. कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने शाळा आणि क्लासेस सुरू झाले आहेत. त्यामुळे मे महिन्यापासूनच मोबाईलची मागणी वाढली होती. जूनमध्ये मुंबई वगळता राज्यात 15 लाख मोबाईलची विक्री झाल्याची, माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व काही सुरू होत गेले. कोरोनामुळे शाळाही ऑनलाइन माध्यमातून सुरू झाल्या. मात्र, यासाठी पालकांकडे पुरेशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. मुलांचे शिक्षण तर महत्त्वाचे आहे म्हणून पालकांनी लॉकडाऊननंतर मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल खरेदी करण्यास सुरुवात केली. याचा फायदा मोबाईल विक्रेत्यांना झाला असून राज्यात एका महिन्यात सर्वाधिक 15 लाख मोबाईल विक्री झाली आहे.
लॉकडाऊनचा परिणाम -
लॉकडाऊन अगोदर एका महिन्याला मुंबई वगळता राज्यात 8 ते 10 लाख मोबाईलची विक्री होत होती. पण, लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षण जसे सुरू झाले तसे मोबाईल विक्रीच्या व्यवसायात तेजी येत गेली. जून, जुलै महिन्यात दिडपट व्यवसाय झाला असून महिन्याला 15 लाख मोबाईल मुंबई वगळता राज्यात विकले गेले. ऑगस्टनंतर या व्यवसायात पुन्हा घट झाली असून आता पुन्हा मोबाईल दुकानदारांना संघर्ष करावा लागत आहे. ऑनलाइन व्यवसायाचाही मोठ्या प्रमाणात फटका आम्हाला बसला आहे, अशी माहिती अजित जगताप यांनी दिली आहे.
शैक्षणीक शहर पुण्यातही वाढली विक्री -
पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातही एका महिन्यात साधारण तीन लाखांपेक्षा जास्त मोबाईलची विक्री झाली आहे. पुणे जिल्ह्यात 4 हजार 500 मोबाईल विक्रेते असून सर्वाधिक विक्रेते पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती या भागात आहेत. पुणे आणि पिंपरी -चिंचवड परिसरात शाळांची आणि खासगी क्लासेसची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. लॅपटॉप, कॉम्पुटर विकत घेणे प्रत्येकाला आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. त्यामुळे मोबाईलच्या मागणीत वाढ झाली. सात ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या मोबाईल खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे, पुणे जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमोडे यांनी दिली.
पालकांची आर्थिक ओढाताण -
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाइन शाळा सुरू केल्या. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी नवीन मोबाईल घेणे भाग पडले. माझ्या घरात दोन मुले असून मी माझ्या मुलांसाठी एकच नवीन मोबाईल घेतला असून त्यातून दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे, अशी माहिती पालक सोनल कोडरे यांनी दिली. माझे तिन्ही मुले शिकत असून एक मुलगा ग्रामीण भागात राहतो. त्याच्यासाठी नवीन मोबाईल खरेदी केल्याचे, पालक सुरेखा कदम यांनी दिली.