पुणे - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत फिरते विधी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून खेड तालुक्यात फिरते न्यायालय व लोकअदालत (मोबाईल व्हॅन) सुरू करण्यात आली आहे. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरक्त सत्र न्यायालायचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी निर्देशित केल्यानुसार 'न्याय आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हॅन लोकअदालत खेड तालुक्यात दाखल झाली आहे. तालुक्यात पहिल्याच दिवशी पाँईट येथे हा उपक्रम घेण्यात आला. तालुक्यातील इतर गावातही या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हॅन फिरणार आहे. प्रलंबित खटले या माध्यमातून गावातच मिटवले जाणार आहेत.
निवृत्त न्यायाधीश डी. डी. कांबळे यांच्या माध्यमातून फिरते न्यायालय गावागावातील फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे यांच्यावर दोन्ही पक्षकारांशी सल्ला मसलत करून न्याय दिला जाणार आहे. या उपक्रमाचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन खेड विधी सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, 'न्याय आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत मोबाईल व्हॅनचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते रिबीन कापून हिरवा झेंडा दाखवत तालुक्यातील गावांमध्ये रवाना करण्यात आली. तर या उपक्रमातून सामान्य नागरिकांपर्यंत न्यायालयीन कामकाज व कायद्याची माहिती पोहचविली जाणार असून यामुळे वर्षानुवर्षे न्यायालयात सुरु असलेले खटले निकाली निघणार आहेत.