पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात लसीकरण सुरू असलेल्या केंद्रात राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची अशोभनीय बाब समोर आली आहे. राजकीय नेत्यांना गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसेचे गटनेते सचिन चिखले यांचा आज (दि. 16 जाने.) वाढदिवस असून कोविड लसीकरण सुरू असलेल्या केंद्रातच स्थानिक नेत्यांनी वाढदिस साजरा केल्याचे समोर आले आहे.
आरोग्य कर्मचारी, अधिकारी घेत होते कोविड लस
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या आठ रुग्णालयात लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यापैकी पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह काही राजकीय नेते उपस्थित होते. त्यानंतर लसीकरण कक्षात अधिकृत नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यात आली.
लसीकरण सुरू असलेल्या कक्षासमोरील दालनात नेत्याचा वाढदिवस साजरा
लसीकरण करण्यात येत असलेल्या कक्षसमोरील दालनात मनसेचे गटनेते सचिन चिखले यांचा वाढदिवस साजरा करण्यात राजकीय नेते मग्न होते. यावेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, स्वीकृत नगरसेवक बाबू नायर, कैलास बारणे आदी उपस्थित होते. कोविड योद्धाना लस दिल्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात बसविण्यात येत होते. त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहण्याऐवजी हे सर्व नेते वाढदिवस साजरा करत होते. त्यामुळे लसीकरण सुरू असताना वाढदिवस साजरा करणे हे अशोभनीय बाब असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
हेही वाचा - पुणे : प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला सुरुवात