दौंड (पुणे) - तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला खंबीरपणे साथ दिली आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे काही निवडणुकींना याचा फटका बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्येदेखील ही बाब जाणवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अंतर्गत गटबाजी थांबवून, एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कुल-थोरात या दोन्ही गटांकडून बहुमताचा दावा करण्यात येत होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून 51 पैकी 27 ग्रामपंचायत सरपंच, 33 उपसरपंच व 325 ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान सोहळा नुकताच चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात पार पडला. या प्रसंगी आमदार राहुल कुल बोलत होते.
जनतेची सेवा करावी -
तालुक्यातील जनतेला केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना मिळाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक अतिशय खडतर असते. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, तालुक्यातील 325 ग्रामपंचायत सदस्य, 27 सरपंच व 33 उपसरपंचांनी ही अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. जनतेने सर्वसामान्य नागरिकांच्या व गावाच्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिलं असून याचा उपयोग स्वार्थासाठी न करता जनतेच्या सेवेसाठी करावा. भविष्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी आमदार कुल यांनी सांगितले.
हेही वाचा - ठाणे : कंटेनरची 5 वाहनांना धडक, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह तिघे कुटुंबीय मृत्युमुखी
महिला सदस्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या -
दौंड तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर महिला सरपंच व सदस्य म्हणून निवडून आले आहेत. मी माझ्या आईला व पत्नीला राजकीय स्वातंत्र्य दिले असून त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात. त्यामुळे निवडून आलेल्या नवीन महिला ग्रामपंचायत सदस्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असेही आमदार कुल यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवर -
याप्रसंगी माजी आमदार रंजना कुल, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा कांचन कुल, भीमा पाटस चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, नामदेव बारवकर, गणेश आखाडे, मोहन म्हेत्रे, सुरेश शेळके, संजय काळभोर आदींसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.