दौंड (पुणे)- आमदार राहुल कुल यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अडचणींबाबत प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे महामार्गावर अंतिम प्रस्ताव लवकरच सादर होणार आहे. या बैठकीसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर सुहास चिटणीस, डेप्युटी मॅनेजर अभिजित औटे, रेसिडेंट इंजिनिअर शैलेश माने आदी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांशी बैठक
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पुणे-सोलापूर महामार्गावरील विविध अडचणींसंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू असून, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मागील आठवड्यामध्ये दिल्ली येथे भेट घेतली होती. त्या अनुषंगाने पुणे-सोलापूर महामार्गाच्या निगडित विविध समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंतिम प्रस्ताव सादर करणेकामी चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली असल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.
आमदार राहुल कुल यांची मागणी
कवडीपाट (लोणीकाळभोर) ते कासुर्डी यादरम्यान रास्ता रुंदीकरण करणे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारणे, यासाठी प्राथमिक प्रस्ताव तयार करावा. यवत ते पाटसपर्यंत सर्व्हिस रोडसह इतर अपूर्ण कामे पूर्ण करणेसाठी ५७ कोटी रुपयांचा प्रस्तावास तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये समाविष्ट नसलेल्या काही बाबी सुचवून त्यांचा देखील समावेश या प्रस्तावामध्ये करून, सदर प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवावा. कवडीपाट ते पाटस पर्यंतच्या मार्गाचा समावेश संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये करावा, तसेच या रस्त्यावरील सर्व अपघाती ठिकाणे निश्चित करावेत व अपघात होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात व प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवावा, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
हेही वाचा- मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठा क्रांती मशाल मोर्चा मागे