पुणे - माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावरील टीका केली होती. ही टिका योग्यच असल्याचे त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेत सगळे पिसाळलेले आहेत का? याचा तपास केला पाहिजे, असे विधानही त्यांनी केलं आहे. याबरोबरच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा गुरूवारी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या तुळापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमदार नितेश राणे आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. माजी खासदार निलेश राणे यांनीही राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टिकेचे आमदार नितेश यांनी समर्थन केले आहे.
हेही वाचा - राजेंना कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते द्यावेत - नवाब मलिक