खेड (पुणे) - राजगुरूनगर येथे मार्च महिन्यात एका अल्पवयीन मुलीस चॉकलेट खायला देवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील फरार आरोपीस २ महिन्यानंतर खेड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.
खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील आरोपी संदीप ढमाले (३८) यांने अल्पवयीन मुलीला गुंगी येण्याचे चॉकलेट खायला दिले. तिला झोप आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर कोणाला काही सांगितले तर तुला जिवे मारून टाकील अशी धमकी दिली आहे. ही घटना मार्च महिन्यात घडली होती. याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४, ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत तक्रार दिल्यावर आरोपी संदीप हा पसार झाला होता. दि. २८ मे रोजी रात्री खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती की, आरोपी संदीप हा पुणे येथे येणार आहे. माहितीच्या आधारे खेड पोलिसांनी सापळा रचला. त्याप्रमाणे सदरचा आरोपी हा पुणे ते सिंहगड रस्त्यावर भूमकरनगर पुलाखाली उभा असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीने गुन्हाची कबूली दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाटे हे करीत आहे.
हेही वाचा - मध्य प्रदेश : अल्पवयीन मुलांसमोर गर्भवती महिलेवर बलात्कार