बारामती : राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडविल्या जात आहेत. राज्यात सामाजिक शांतता टिकवणे हे राज्य सरकारचे दायित्व आहेत. यात जनतेनेही सहकार्य करावे. परंतु सध्या राज्यात सुरु असलेले प्रकार हे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान आहे, असा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. मविआ सरकारच्या काळात नको त्या गोष्टीचे उदात्तीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यावर निशाणा : यावेळी विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यावर जोरदार निशाणा साधला. मंत्री विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण झाले. औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणारांचे उदात्तीकरण होते, याचा अर्थ काय? लव्ह जिहादची प्रकरणे वाढत चालली आहेत. शेरगील उस्मानची सभा झाली, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अल्पवयीन मुलींना पळविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले. त्यावेळी मविआ सरकारने मतांच्या राजकारणासाठी बघ्याची भूमिका घेतली. हीच मंडळी आज आम्हाला तत्वज्ञान सांगायला निघाली आहेत. त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये काय घडले याचा अंतर्मुख होवून विचार करावा.
औरंगजेबाचे फोटो नाचविण्याचे धाडस : आमच्या सरकारमध्ये सगळ्या समाजविघातक शक्तींविरोधात कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा समाजविघातक घटना राज्यात डोकेवर काढत असतील तर, ते आम्ही खपवून घेणार नाही. औरंगजेबाचे फोटो नाचविण्याचे धाडस होते, त्यावर मविआ नेते चुप्पी साधून आहेत. त्यांचा हा चुप्पीपणा जनतेसमोर आहे. परंतु अशा नाचणारांचे नाचणे कायमस्वरुपी बंद करावे लागेल.
संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण: राज्यातील दंगलींबाबत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी, खासदार संजय राऊत यांनी केल्याच्या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, संजय राऊत हे वाया गेलेले प्रकरण आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझा माध्यम प्रतिनिधींना सल्ला आहे की, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. शरद पवार यांनी संभाजीनगर नव्हे तर औरंगाबादच म्हणणार असे सांगितल्याच्या प्रश्नावर यासंबंधी माहिती नाही, माहिती घेवूनच प्रतिक्रिया देईन असे विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा -