पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्याचं विधान केलं. त्यामुळे राज्यभरात चर्चेला मोठं उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक कामाबाबत प्रेरणा घेऊन आपण सत्तेत आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याबाबत अजित पवार यांच्याकडून कोणताही संभ्रम नाही. मात्र काही राजकीय नेत्यांची पावलं एनडीएकडं पडत आहेत की काय, असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत हे पुण्यातील परिवर्तन युवा परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार महायुतीमध्ये : संभ्रमात राहण्याची काहीही गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत चांगली कामं होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गतिमान काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडं आकर्षित होऊन अजित पवार हे तिसरं इंजन घेऊन सरकारमध्ये येत असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्याकडून कोणताही संभ्रम नाही. ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा सत्कार होत आहे, ते न भूतो न भविष्यती असं होत आहे. त्यावर अजित पवार आमचे नेते आहेत, असं जर शरद पवार म्हणत असतील तर काही लोकांचं पाऊल हे एनडीएकडं पडत आहे की काय, अशी शंका येत असल्याचं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार यांनी केली 'लाईन क्लिअर' : सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांची लाईन क्लिअर केल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. आपण कोणासोबत आहोत आणि कोणासोबत राहणार आहोत याबाबतही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोण पंतप्रधान होणार, याबाबत देखील त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. आता इंडियामधील काही घटक पक्ष काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. हा संभ्रम त्यांच्यासाठी असल्याचंही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे का : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे का, याबाबत उदय सामंत यांना माध्यम प्रतिनिधींनं विचारलं. यावेळी त्यांनी काही काळ मी राष्ट्रवादीचा घटक होतो. आता अजित पवार 40 ते 42 आमदारांना सोबत घेऊन आमच्याबरोबर आले आहेत. त्यामुळे याला फूट म्हणायची की नाही हे सांगता येणार नाही. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये नसून महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला 45 जागा मिळणार असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला.
हेही वाचा -