पुणे - येथील जम्बो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना रेमडेसिवीर औषध मोफत देण्यात येणार आहे. श्रीमंत लोकांना हे औषध मोफत देता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. पुण्यातील जम्बो कोविड केअर रुग्णालयाला भेट देऊन टोपे यांनी रुग्णांची विचारपूस केली. तसेच रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला.
रेमडेसिवीर औषधांची किंमत आधी 4 हजार होती. आता ती दोन हजारांवर आली आहे, ही किंमत आणखी कशी कमी होईल यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे औषध तयार करणाऱ्या कंपन्याशी चर्चा करून रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा कसा वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत, असे टोपे म्हणाले.
जम्बो रुग्णालय पूर्ण क्षमतेने सात दिवसात कार्यान्वित होणार आहे. सध्या या ठिकाणी 400 खाटा उपलब्ध आहेत. उर्वरित 400 खाटा, डॉक्टर आणि इतर सुविधा सात दिवसात उपलब्ध करण्यात येणार आहेत. या रुग्णालयाकडे फक्त कोविड संबंधित रुग्णालय पाहिले जाणार नाही. कारण याठिकाणी येणाऱ्या रुग्णाला कोविड व्यतिरिक्त इतरही आजार असू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या आजारावर उपचार करणाऱ्या व्हिजिटिंग डॉक्टरांना याठिकाणी पाचारण केले जाणार आहे.
जम्बो रुग्णालय सुरू झाल्यानंतर सुरुवातीला अनेक तक्रारी होत्या. रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नसल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीही काही नातेवाईकांनी केल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयाच्या अंतर्गत कारभारात बदल करण्यात आले होते. सुरुवातीला खासगी कंपनीला चालवण्यासाठी दिलेला या रुग्णालयाचा ताबा नंतर महापालिकेला देण्यात आला आहे. त्यानंतर आता रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा - CORONA : कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात; भारतात 1600 तर पुण्यात 200 जणांवर होणार चाचणी