पुणे - सुप्रिया सुळे या केवळ शरद पवार यांच्या कन्या आहेत, एवढ्या एका बाबींवर त्या निवडून येतात. त्यांचे कर्तृत्व काहीही नाही, अशी टीका राज्यमंत्री शिवतारे यांनी केली. बारामती लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीने तगडा उमेदवार दिल्यास सुळे यांचा पराभव होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, की सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून मतदारसंघांमध्ये कुठलीही मोठी योजना आणलेली नाही. चष्मे वाटणे, श्रवण यंत्र वाटणे, सायकली वाटप करणे, अशा प्रकारची कामे गणेश मंडळाचा अध्यक्ष देखील करतो. ती कामे सुप्रिया सुळे यांनी केली आहेत, अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली.
सुप्रिया सुळे या केवळ सेल्फी काढत असतात असेही ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाच्या भीतीमुळे माघार घेतल्याची टीकादेखील शिवतारे यांनी केली. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून घेतलेली माघार आणि मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांचे नाव पुढे करण्याची बाब, यामुळे पवारांच्या विरोधात वातावरण असल्याचे शिवतारे म्हणाले. एखाद्याचा मुलगा आहे, म्हणून उमेदवारी द्यायची, काही कर्तुत्व नसते ना, लगेच मॅनेज केले जाते, याला काय म्हणायचे ? यांनी समाजासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करत विजय शिवतारे यांनी पार्थ पवार तसेच सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत टीका केली आहे. समाजासाठी यांनी काय केले आहे, समाजात काही काम करण्याअगोदरच उमेदवारी मागायला यांनी सुरुवात केली असेही शिवतारे म्हणाले.