पुणे - शहर आणि परिसरात येत्या काही तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यते नंतर पुणे महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी गरजेचे असेल तरच घरातून बाहेर पडावे अन्यथा घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिप रिप सतत सुरू असते. थोड्या विश्रांतीनंतर पावसाच्या जोरदार सरी देखील शहरात बरसलेल्या आहेत.
मागील चोवीस तासात पुणे आणि परिसरात ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांमध्ये जोरदार पाऊस झाल्याची नोंद आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात ५५ मिमी, वरसगाव ९६ मिमी, पानशेत ९७ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मिमी पावसाची नोंद झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.