पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 आरोपींना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. प्रशांत कैलास भालेकर (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रोहित ओव्हाळ, रोण्या फजगे आणि आदित्य अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रशांत कैलास भालेकर (रा. निगडी ओटा स्कीम) हा गुरुवारी दुपारी मित्रांसह शिरगाव येथील प्रति शिर्डी साईबाबा यांचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. तो आणि मित्र दर्शन घेऊन परततताना विकास नगर किवळे येथे मिसळ खाण्यासाठी थांबले. दरम्यान, संधी साधत आरोपी डॅनी तांदळे, मुख्य आरोपी रोहित ओव्हाळ याच्यासह इतर दोन साथीदारांनी पूर्व वैमनस्यातून प्रशांतवर तलवारीने हातावर वार करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर आरोपींनी घटनस्थळावरून पोबारा केला. परंतु, काही तासांमध्ये यातील तीन आरोपींना देहूरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - बारामतीत घरफोडी, १ लाख ५७ हजारांचा माल लंपास
जखमी प्रशांतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करत आहेत.
हेही वाचा - जेव्हा रक्षकच बनतात भक्षक, तरुणांना लुटणारे गजाआड