पुणे - आषाढी पायी वारीचा तिढा अद्याप कायम आहे. आज (शुक्रवारी) पुन्हा विभागीय आयुक्तांसोबत पालखी विश्वस्तांची बैठक होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानचे विश्वस्त उपस्थित राहणार आहे. सरकारपुढे नवीन प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती विश्वस्त मोरे यांनी दिली.
प्रशासनापुढे मांडणार हा प्रस्ताव -
पालखी प्रस्थानावेळी प्रत्येक दिंडीतील एक विणेकरी यांना मंदिर परिसरात प्रवेश देण्यात यावा. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत ४३० दिंड्या तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत ३३० दिंड्या असून या सर्व विणेकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता यावे, या उद्देशाने हा प्रस्ताव देवस्थान समितीच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. याआधी सरकारने प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी आणि देहू देवस्थान यांना 100 वारकऱ्यांची व इतर मानाच्या 8 पालखी सोहळ्यातील देवस्थानांना 50 वारकऱ्यांची परवानगी देण्यात आली होती. मात्र, वारकऱ्यांचा होणारा विरोध पाहता देवस्थान समिती पुन्हा सरकारपुढे नवा प्रस्ताव ठेवत आहेत.
आज संध्याकाळी चार वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे बैठक होणार आहे. यानंतर काय निर्णय घेतला जातोय याकडे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून राहिले आहे.