पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खासगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. प्रवास करुन आलेल्या या प्रवाशांकडून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये परराज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान कोणतीही कोरोनाची लक्षणे नसल्यास संबंधितांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारुन त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात यावे. ज्या प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करणे कौटुंबिक कारणाने शक्य नसल्यास अशा प्रवासी नागरिकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात यावे. वैद्यकीय तपासणी दरम्यान कोरोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवासी नागरिकांना कोव्हिड तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावी. होम क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या प्रवासी नागरिकांना घरगुती विलगीकरणा दरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास त्यांना तात्काळ कोव्हिड तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे. प्रवास करुन आलेल्या सर्व नागरिकांना विलगीकरणा दरम्यान आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - पु्ण्याहून 1200 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे लखनऊकडे रवाना