पुणे - पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नाल्यांच्या साफसफाई संदर्भात 3 दिवसीय मान्सूनपूर्व पूरनियंत्रण प्रभाग दौरा सुरू करण्यात आला. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात सक्रिय झालेला मान्सून सध्या शहरात देखील बरसत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व दौऱ्यावर शहरातील नागरिक अनेक प्रश्न विचारत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये मान्सूनपुर्व पुरनियंत्रण दौरा गेल्या वर्षी शहराच्या अनेक भागात नद्यांचे पाणी शिरले होते. पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्या शहरातून जातात. त्यामुळे यावर्षी तरी मान्सूनपूर्व नियोजन होणे गरजेचे होते. या दौऱ्याची सुरूवात निगडी येथील महाराणा प्रताप गार्डन टिळक चौक येथून झाली. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या महानगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमध्ये मान्सूनपुर्व पुरनियंत्रण दौरा 3 दिवसीय मान्सूनपुर्व पुरनियंत्रण प्रभाग दौऱ्यात आज अ, ब, व, फ या प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. तसेच पुढील 2 दिवसात उर्वरित प्रभागातील नाल्यांची पाहणी करण्यात येणार आहे. पावसामुळे शहरातील होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्यक ती दक्षता घेण्यात येते. ज्या ठिकाणी नाल्यांची साफसफाई अपूर्ण आहे, त्या ठिकाणांची साफसफाई त्वरीत करण्यात यावी, तसेच ड्रेनेज व पाणी पुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, याबाबतच्या सुचना महापौर माई ढोरे यांनी संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. महापौर ढोरे यांनी केलेल्या सूचना वेळेत होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या अगोदर किंवा शहर रेड झोनमधून वगळण्यात आल्यापासून महानगर पालिका प्रशासन काय करत होते. अस सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.