पिंपरी चिंचवड/ पुणे Raj Thackeray : नाटक म्हणजे या विंगेतून हा गेला आणि त्या विंगेतून तो आला इतकं सोपं काम नाही. चित्रपट, मालिका आणि इतर जे व्हिडिओ माध्यमं आहेत, त्यामध्ये सर्वात कठीण माध्यम कोणतं असेल तर ते नाटक हे आहे. त्यामुळं नाटककारांचे, अभिनेत्यांचे कौतुकच केले पाहीजे, असे मत नाट्य संमेलनात झालेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं. परंतु, त्याचवेळी राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे एकमेकांशी ज्या नावानं बोलतात त्यावरून चांगलेच कान टोचलेत.
...तर तुम्हाला कोण मोठा कलाकार म्हणेल? : तुम्ही एकमेकांना ज्या पद्धतीनं आवाज देता, एकमेकांची ज्या पद्धतीनं नाव घेता त्यावरून तुम्हाला कुणीच मान देणार नाही अस म्हणत, तुम्ही मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एकमेकांना अद्या, पद्या शेळ्या, मेंढ्या अशा नावानं हाक मारत राहिलात तर तुम्हाला कोण मोठा कलाकार म्हणेल? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्हीच जर अशा पद्धतीनं बोललात तर तुम्हाला कुणी कसं लक्षात ठेवेलं. त्यामुळं तुम्ही हे असलं बोलणं लवकरात लवकर बंद करून एकमेकांना सर, साहेब अशा नावानं बोलावं, असा सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी दिलाय.
त्यांचा आदर्श घ्या : मराठी चित्रपटसृष्टीत कुणी स्टार नाही. कलावंत मात्र आहेत. परंतु, तुम्ही साऊथ चित्रपटसृष्टीचं पाहीलं तर मोठ्या प्रमाणात स्टार पाहायला मिळतील. कारण तिकडे सोबत पार्टीला बसल्यावर एकमेकांना अरे-तुरे करतील. पण महत्वाच्या कार्यक्रमात, स्टेजवर भेटल्यावर ते नक्की एकमेकांना सर, साहेब अशा आदराने बोलतात. त्यामुळे तिकडे ते स्टार झाले असं निरीक्षणही राज ठाकरे यांनी यावेळी नोंदवलंय. त्यामुळे तुम्ही तुमचा मान राखला नाही तर लोकं तुम्हाला मान देणार नाहीत, असंही राज ठाकरे म्हणालेत.
जाती-पातींमध्ये विभागलो : तरुणाई मोबाईलवरी रिल्समध्ये, काही महिला वर्ग टेलिव्हीजनवरील मालिकांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळं आपली काय संस्कृती होती, काय परंपरा होती, आपले काय माध्यम होते हे पूर्णपणे आपण विसरलोत. तसेच, राजकारणात सुरू असलेले जाती-पातीचं राजकारण आता नाटक, चित्रपटांमध्येही आलंय. त्यामुळे आपण आता जाती-पातींमध्ये विभागलो गेलोत, अशी खंतही राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण इतके गुंतलोत की आपण आपली सर्व संस्कृती, परंपरा आणि आपलं खरं माध्यम आपण विसरलोत, असं दु:ख राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
मुद्दे तेच राहीले : निवडणूक लढवण्याची मला लाज वाटते. कारण मुद्दे आजही तेच आहेत, जे १९५२पासून आहेत. माझे आजोबाही तेच सांगायचे, वडीलही तेच सांगायेच, चुलतेही तेच सांगायचे आणि मीसुद्धा तेच सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले. देशात आजही पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य हेच मुद्ये आहेत. त्यापुढे आपण गेलो नाहीत, ही कसली प्रगती? असा खेद राज ठाकरे यांनी व्यक्त करत, या मुद्द्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सिनेमा, मालिका, संगीत या गोष्टींच्या माध्यमातून कलाकारांनी मोठ काम केलंय. त्यांचे आपण आभारी असायला हवं, असंही राज यावेळी म्हणालेत.
हेही वाचा :
1 तंत्रज्ञानाचे गुलाम न होता त्याचा फायदा लक्षात घ्या; नाट्य संमेलनात लेखक, नाटककारांचा सूर
2 'राहुल नार्वेकरांना आदेश देण्याचे सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाहीत'
3 विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; अपात्रतेच्या निकालाआधीच मोठी खलबतं?