पुणे Maratha Reservation Row : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला असून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रस नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत विधान केलं आहे. ते म्हणाले की "मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळं माझं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसनं 2014 मध्ये पाडलं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरं गेलो असतो. त्यामुळे 2014 मध्ये भाजपाऐवजी आमचंच सरकार आलं असतं. आमच्या सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवला असता, असा दावाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचं सरकार पाडलं : पृथ्वीराज चव्हाण पुढं बोलताना म्हणाले, की "मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा, मला सहकार क्षेत्रात जेवढा बदल करता येईल, तेवढा मी बदल केला. राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला. पण या निर्णयाची मोठी राजकीय किंमत मला मोजावी लागली. आमच्या बरोबर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमचं सरकार पाडलं. जर तेव्हा आमचं सरकार पडलं नसतं, तर 2014 मध्ये भाजपा सत्तेत आली नसती. त्यामुळे मराठा आरक्षण देण्याचा प्रश्न तेव्हाच सुटला असता, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच पहिल्यांदा 50 वर्षात मराठा आरक्षणाबाबत कुणी निर्णय घेतला असेल, तर तो मी घेतला, मात्र न्यायालयात तो टिकलं नाही. जर पुढं आमचं सरकार असतं, तर आम्ही ते टिकवलं असतं, असं देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार वितरण : पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना इथं कॉम्पिटिटर्स फाऊंडेशनच्यावतीनं सोमवारी 'संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार' वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 'संसदरत्न खासदार राजीव सातव स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा :
- Prithviraj Chavan on Reservation : तुम्हाला छत्रपतींचे पुरावे चालत नाही तर निजामचे पुरावे चालतात, पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
- Prithviraj Chavan On Loksabha Election: पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील, कारण... पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
- Prithviraj Chavan Interview : 'भारत' म्हणायचं की 'इंडिया'? काँग्रेसची काय भूमिका? जाणून घ्या पृथ्वीराज चव्हाणांकडून