पुणे (बारामती) - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर दिसत आहेत. राज्यातील मराठा समाज संतप्त झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे.
मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निषेधाचा फलक लावून मराठा आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी केली. एकतर आरक्षण लागू करा नाहीकर खुर्च्या खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत हे ढोल बजाओ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे बारामतीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
'मराठा समाजाच्या आरक्षणा'ला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनी कोणतीही कागदपत्रे न्यायालयातील वकिलांना दिली नाही व ते स्वतःही या केसपासून जाणून-बुजून दूर राहिले. या सर्व गोष्टींमुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे आरक्षणाच्या स्थागितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे आरोप मराठा समाज करत आहे. याबाबत अजित पवार यांना निवेदन दिले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शैक्षणिक प्रवेश, नोकरीतील आरक्षण व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षांमध्ये मराठा समाजातील मुलांचे भविष्य टांगणीला लागले आहे. राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात प्रभावी बाजू मांडावी अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, अशा इशारा निवेदनात आहे.