पुणे - दौंड तालुक्यातील उंडवडी येथील भोसलेवाडी येथे जमिनीच्या बांधाच्या वादातून पुतण्याने चुलत्यासह दोन चुलत भावांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चुलता बापू गारुडी यांचा मृत्यू झाला असून चुलतभाऊ गंभीर जखमी झाले आहेत. भोसलेवाडी येथे गारुडी कुंटुबीयांची शेती आहे. पोपट आणि बापू गारुडी हे दोघे भाऊ असून यातील पोपट गारुडी यांच्या एका मुलाने बापू गारुडी आणि त्यांच्या दोन मुलांना अगोदर अल्टो कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने चुलते बापू लक्ष्मण गारुडी व त्यांच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला. यात बापू गारुडी हे जागीच ठार झाले तर त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत.
मृत बापू गारुडी यांचा मृतदेह यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी अमित पोपट गारुडी याने यवत पोलीस ठाण्यात हजर राहून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.