Pune crime news : पुणे हादरले! लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचा चाकूने भोसकून निर्घृण खून - Shweta Ranwade murder case
लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचा ( Highly Educated Girl ) चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी औंध येथे घडली आहे. ( Man Brutally stabbed to death of a highly educated girl )
पुणे : लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीचा ( Highly Educated Girl ) चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी औंध येथे घडली. श्वेता विजय रानवडे (वय २६, रा. सिद्धार्थ नगर औंध पुणे) या तरुणीचा या दुर्दैवी घटनेत खून झाला असून या प्रकरणी प्रतीक किसन ढमाले (वय २७, रा. कडूस, राजगुरुनगर पुणे) यांच्याविरुद्ध चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Man Brutally stabbed to death of a highly educated girl )
लग्नात झाली ओळख : श्वेता हिची प्रतीक याच्यासोबत २०१८ मध्ये नातेवाईकांच्या लग्नामध्ये ओळख झाली होती. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांनंतर प्रतीक याने श्वेता हिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिला फोन वरून धमकवणे तसेच इतर मानसिक छळ सुरू केला होता. त्यामुळे श्वेताने त्याला लग्नास नकार दिला होता. ही बाब तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितलेली होती. मात्र प्रतीक आत्महत्येची धमकी देऊन तिला आणखी त्रास देत होता.
प्राणघात हल्ला : दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी तिने चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज देखील दाखल केला होता. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्वेता तिची आई दिपाली यांच्यासोबत दुचाकीवरून घरी आल्यानंतर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या प्रतीक याने तिच्या मानेवर छातीवर व पोटावर चाकूने वार केले. हा प्राणघात हल्ला करून प्रतीक तिथून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
परदेशी शिक्षणासाठी इच्छा : श्वेता ही सीएचा अभ्यास करत होती. काही दिवसांपूर्वी ती उच्च शिक्षणासाठी परदेशातही गेलेली होती. तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झालेले आहे. घरी आई व भाऊ याच्यासोबत ती राहत होती. सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिला पुन्हा परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची तिची इच्छा होती. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रतीकने तिचा त्यापूर्वीच दुर्दैवी अंत केला. श्वेताच्या या निर्घृण खूनाच्या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांसह नातेवाईक व परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
तर श्वेता जीवंत असती : दोन महिन्यापूर्वी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जावरून प्रतिक वर कायदेशीर कारवाई झाली असती तर कदाचित आज श्वेताचा जीव वाचला असता. या गंभीर घटनेसाठी जबाबदार दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी श्वेताच्या कुटुंबीयांनी केली आहे. आत्ता या प्रकरणी श्वेताच्या हत्येचा आरोपी प्रतिक ढमालेनेदेखील मुळशी टाटा डॅम जवळ फाशी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.