पुणे - कुटुंबातील किरकोळ वाद टोकाला जात त्यातून दुर्दैवी घटनाही घडत असतात, अशीच घटना चाकण उद्योगनगरीतील खराबवाडी गावात घडली आहे. घरातील किरकोळ कारणावरून चर्चा करत असताना तरुणाने सासऱ्याच्या मदतीने भाऊ आणि वडिलांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
निलेश मुरलीधर भांबेरे (वय 30, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मुरलीधर भांबेरे (रा. खराबवाडी), सासरे महादेव गीते (रा. चिंचोली, ता. शेगाव) यांच्या विरूद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश आणि गणेश या दोन भावांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे गणेशला समजावून सांगण्यासाठी त्यांचे वडील मुरलीधर भांबेरे व मामा मुरलीधर कडू गणेशच्या घरी गेले होते. समजावून सांगत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी गणेशचे सासरे महादेव हेदेखील तेथेच होते. गणेश आणि सासरे महादेव या दोघांनी मिळून गणेशच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच निलेश आणि त्याच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यासंदर्भात पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.