पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आश्विक शुक्ला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी आणि आश्विक शुक्लाची ओळख लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाइटवरून झाली होती. दरम्यान, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय ( Central Ministry of Agriculture and Farmers Welfare ) येथे उपसंचालक ( Deputy Director ) असल्याचे आरोपी शुक्लाने पीडितेला सांगितले होते. ही घटना 23 जुलै, 2021 ते 07 ऑक्टोबर, 2021 च्या दरम्यान घडली आहे.
लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवर झाली ओळख - याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडमध्ये नामांकित कंपनीत व्यवस्थापक ( Manager ) म्हणून काम करणाऱ्या तरुणीने लग्न जुळवण्याच्या वेबसाइटवर नोंदणी ( Register ) केली होती. आरोपी आश्विकने तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. काही दिवसांनी ते दोघे भेटले, त्यांच्यात चांगली ओळख झाली. दरम्यान, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे आरोपीने पीडित तरुणीला सांगितले. त्यानंतर, दोघांमध्ये दररोज भेट, चॅटिंग, फोन व्हायचा. आश्विक शुक्लाने पीडितेसोबत अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लग्न झाल्यानंतरच हे सर्व करू, असे आरोपीला पीडितेने सांगत नकार दिला.
व्यवसाय करू म्हणत आठ लाख लुबाडले अन् कारमध्ये केला बलात्कार - एकेदिवशी पीडित तरुणी आश्विक वास्तव्यास असलेल्या घरी गेली. तिथे अश्विकने तरुणीला कस्टममधील वस्तू कमी किंमतीत आणून ते विकण्याचा व्यवसाय करू, असे सुचवले. यासाठी मी तीस लाख जमवले असून उर्वरित दहा लाख दे, असे म्हटला. यावर तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. पण, अत्यंत भावनिक करत आपल्या भविष्याचा विचार कर आयुष्य सेट होईल, असे म्हणत तरुणीला विनवणी केली. त्यानंतर त्या तरुणीने आठ लाख दिले. त्यानंतर काही दिवसांनी तरुणीला घरी सोडायला जात असताना वाकड परिसरातील हॉटेलच्या पाठीमागे कार नेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर तरुणी तणावात, गुन्हा दाखल होताच आरोपी ताब्यात - या घटनेनंतर आरोपी आश्विक शुक्लाने भेटणे कमी केले, तसेच फोनही बंद ठेवला. दरम्यान, शुक्ला वास्तव्यास असलेल्या घरी तरुणी जाऊन आली. तेथील फ्लॅट बंद होते शेजारी विचारपूस केली असता शुक्ला हा येथे राहत नसल्याचे समोर आले. दरम्यान, आपली आर्थिक फसवणूक झाली असून बलात्कार झाल्याचे समजताच तरुणी तणावात गेली. तणावातून सावरताच वाकड पोलीस ठाण्यात शुक्ला आणि मित्राच्या विरोधात तिने तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.