पुणे : येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आले होते. दुसरीकडे साखर उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे हे देखील पुण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात (NCP Crisis) पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपती चोरडिया (Sharad Pawar Ajit Pawar Meeting) यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीबाबत अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
शरद पवार, अजित पवार पुण्यात - चांदणी चौकातील कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका बड्या उद्योगपतीच्या घरी दाखल झाले. या नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित असल्याची चर्चा आहे. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये जर भेट झाली असेल तर त्यात आश्चर्य काहीच नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
याआधीही घेतली होती शरद पवारांची भेट - मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीनवेळा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार 14 जुलैला शरद पवार यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली होती. मात्र, काकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तिथे राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यावेळी अजित पवार यांनी दिली होती.
वायबी येथे दोनवेळा शरद पवारांची भेट - राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर अन्य आठ आमदार हे मंत्री झाले. त्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे अचानक भेट घेतली होती. तर लगेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या इतर बंडखोर आमदारांना घेऊन अजित पवार यांनी दुसऱ्यांना शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. तर यातून मार्ग काढण्याची विनंती राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.
शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक? - राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावेळी दोन्ही गटांनी वेगवेगळे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. आमच्या गट नसून, एकच पक्ष असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते. तर मी भाजपासोबत जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यावेळी शरद पवार यांनी दिली होती. तर लगेचच लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर आले होते. तर पहाटेच्या शपथविधीलाही शरद पवार यांची सहमती होती. त्यामुळे शरद पवार हे कधी काय डाव खेळतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे शनिवारी जरी बैठक झाली असली तरी त्यात नेमकी काय चर्चा झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा -
- Amit Shah : शरद पवारांचा उल्लेख करून अमित शाहांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले..
- Sharad Pawar On Babri Masjid : बाबरी मशीदबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले पंतप्रधान नरसिंह राव यांनी ठेवला विजया राजे सिंधियांच्या शब्दावर विश्वास अन् मग . . . .
- NCP Political Crisis : केरळमधील राष्ट्रवादीचे आमदार थॉमस यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी, शरद पवार यांनी का केली कारवाई?