पुणे MP Amol Kolhe on DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावर आता खासदार कोल्हे यांनीही पवारांना प्रत्युत्तर दिलंय. खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात मंगळवारी भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले अमोल कोल्हे : अजित पवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना खासदार कोल्हे म्हणाले की, अमोल कोल्हे त्याच्या घरातील प्रश्नांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत नाही. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. त्यामुळं कोणत्याही वैयक्तिक टीकेपेक्षा धोरणावर बोलणं हे महत्त्वाचं आहे. माझ्या फेसबुकची फक्त टाईमलाईन जरी बघितली तरी सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आज डिजिटल जमाना आहे. त्यांनी त्यांच्या माझ्या पाच वर्षातील विविध सोशल मीडियावरील अकाउंटची टाइमलाईन बघावी. त्यात मी मतदार संघात कधी-कधी गेलो आणि कोणती विकास काम केली हे दिसेल. राजीनाम्याच्या बाबतीत कोल्हे म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या विषयी माझ्या मनात आदर होता. पुढंही असाच आदर राहणार आहे. खासगीत जी चर्चा झाली ती सार्वजनिक करायची नसते, असं मी मानतो.
शेतकरी मोर्चा काढणार : शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत खासदार कोल्हे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं यात सहभाग घेत आहेत. आमचे महत्त्वाचे सहा मुद्दे असल्याचं शेतकरी आवर्जून सांगत आहेत. यात कांद्याची निर्यात बंदी तत्काळ उठवण्यात यावी, कांद्याच्या निर्यातीच धोरण निश्चित करण्यात यावं, बिबट्या प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेज लाईट लावण्यात यावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रु अनुदान देण्यात यावं, पीकविमा कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांना विम्याची रक्कम सहज उपलब्ध व्हावी, तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, अशा मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळताना अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारनं सुटसुटीत धोरण तयार करावं, अशा मागण्या या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडं करण्यात येणार असल्याचं कोल्हे म्हणाले.
शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सत्ताधारी सांगतात. पण त्यांच्या कृती आणि करण्यामध्ये खूपच फरक आहे. जर हे शेतकऱ्यांचं सरकार असेल तर जेव्हा कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकार धोरण घेत असताना सरकार ठामपणे का सांगत नाही-खासदार अमोल कोल्हे
सरकारवर टिकास्त्र : खासदार कोल्हे पुढं म्हणाले की, मागील आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानवरुन ट्विट करत 2 लाख टन कांदा खरेदी करणार आणि 2410 रुपये प्रति क्विटंल देणार असं सांगितलं होत. पण आज ती खरेदी झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी फक्त तिथं जाऊन फोटो काढतात. सरकार ठामपणे का भूमिका घेत नाही? सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी केंद्र सरकारची वेळ मिळते. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी का वेळ मिळत नाही? असा सवाल यावेळी कोल्हे यांनी केलाय.
हेही वाचा :