पुणे : 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी भेटणार आहे. 10 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून शुक्रवारी अंतिम उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. गादी विभागातून दोन तर माती विभागातून दोन हे आज महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीसाठी लढणार आहेत. त्यात महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी मिळणार आहे. याची उत्सुकता आता महाराष्ट्राला लागली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश : कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढून ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी दावेदारी दाखल करणार आहेत. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. माती विभागातून झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही मल्लांनी एकमेकांना केवळ दहा सेकंदच आजमावले. त्यानंतर महेंद्र गायकवाडने थेट एक टांग डाव टाकला अन शुभमचा तोल गेला. मिळालेल्या संधीचा फायदा करून घेताना महेंद्र गायकवाडने शुभमला थेट चीतपट करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
हर्षवर्धन सदगीरची कामगिरी : दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बालारफिक शेखला केवळ ३० सेकंदात चीतपट करताना माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला. सिकंदर शेखने बाला रफिक शेखवर पहिल्या १५ सेकंदात ताबा मिळविताना २ गुणांची कमाई केली. त्यानंतर आपले आक्रमण अधिक धारधार करताना सिकंदर शेखने बाला रफिकवर भारंदाज डाव टाकताना कुस्ती धोकादायक स्थितीमध्ये नेवून बलाराफिकला दाबत चीतपट करताना मैदान मारले. गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुणे जिल्ह्याच्या तुषार डुबेला ५-० असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. तुषारने निष्क्रिय कुस्ती केल्याने एक गुण हर्षवर्धनला देण्यात आला. त्यानंतर कटऑफमुळे हर्षवर्धनला पुन्हा एकदा एक गुण मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा तुषारच्या निष्क्रिय खेळामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीत हर्षवर्धनने ३ -० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने तुषारवर ताबा मिळविताना अजून दोन गुण वसूल केले. व गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
शिवराज राक्षेची कामगिरी : दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला ११-१ असे पराभूत करताना गादी विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत शिवराजने तीन वेळा गणेशला मैदानाबाहेर ढकलताना ३ गुणांची कमाई केली. त्यावेळी गणेशने एकदा शिवराजला मैदानाबाहेर ढकलत एक गुण वसूल केला. त्यानंतर शिवराजने दुहेरी पट काढताना २ गुण मिळविताना ५-१ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत मात्र शिवराजने अजून आक्रामक खेळ करताना गणेशवर ताबा मिळवत २, झोळी डावावर २ आणि कुस्ती धोकादायक स्थितीत नेवून २ असे तब्बल ६ गुण वसूल केले. गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. काका पवार यांच्या तालमीतले दोन पहिलवान एक शिवराज राक्षे आणि दुसरा हर्षवर्धन सदगीर हे दोघे मित्र असून ते एकाच तालमीतले एकाच गुरूचे शिष्य आहेत. त्यामुळे या दोन मित्राच्या लढतीकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
खेळ हा खेळा सारखाच खेळला जाईल : दोन मित्राच्या लढतीमध्ये कुठला मित्र बाजी मारणार आणि महाराष्ट्र केसरीसाठी खेळणार हे पाहणे महत्वाचे आहे. दोन्ही मित्राने आम्ही आमच्या परीने तयारी केलेली आहे. डावपेच आखलेले आहेत. शेवटी खेळ आहे खेळात कुणीतरी जिंकेल हरेल. परंतु खेळ हा खेळा सारखाच खेळला जाईल अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मित्रांच्या खेळाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.