बारामती - काही मुद्द्यांवर एकत्र येत राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. सरकार चालवताना काही प्रश्न उपस्थित होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी एक यंत्रणा काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. पवार आज(रविवारी) बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आरबीआयचा निर्णय धोरणात्मक असेल तर स्वीकारावाच लागेल-
आरबीआयने नवीन आदेश दिले असून यापुढे लोकप्रतिनिधींना सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळणार नाही, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु, त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल, असेही मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.