पुणे - 'त्या' अभिनेत्रीच नाव घेण्याचं काही प्रश्न नाही. 'ती' अभिनेत्री नाव घेण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे 'त्या' अभिनेत्रीच नाव न घेता मी इतकेच सांगेन की, ज्या पद्धतीने मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे काम, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचा काम, मुंबई पोलिसांना माफिया म्हणण्याचा काम ज्या व्यक्तीने केले आहे, अशा व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचे काम करत आहे, याचाही विचार समाजाने करायला हवा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिचे नाव न घेता व्यक्त केले. ते येथे आयोजित 'गौरव खाकी वर्दीचा' या कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, राजकीय फायद्यासाठी इतक्या खालच्या दर्जाच्या पद्धतीने या गोष्टी होत असतील तर ही गंभीर बाब आहे. सर्व समाजाने तिचा धिक्कार करावा, हेही खरेच आहे, असेही ते म्हणाले.
काय आहे कंगना प्रकरण?
कंगणाने बॉलिवूडमधील ड्रग्ज लाईनबाबत माहिती असल्याचे सांगितले होते. तिची अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत करण्याची इच्छा आहे. मात्र, आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. हिमाचल प्रदेश पोलीस किंवा केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाल्यास आपण समोर येऊन माहिती देण्यास तयार आहोत, असे कंगणाने म्हटले होते. तसेच सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात उडी घेऊन व मुंबईवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेली अभिनेत्री कंगनाला केंद्र सरकारने 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवली.
कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. यानंतर तिच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असं सांगितले होते. तसेच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही तीने दिले होते. यानंतर ती मुंबईत आली होती. यावेळी अनेक शिवसैनिकांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी करत मुंबई विमानतळावर गर्दी केली होती. दरम्यान, कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून तीचे अवैध कार्यालय देखील पाडले. आपले कार्यालय तोडल्यामुळे कंगनाने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. अनेक दिवस अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत ट्विटरवाद वाद सुरू होता.