पुणे - पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत याठिकाणी एकूण 2 हजार 867 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
लोणावळा परिसरातील भुशी धरण, तुंगार्ली डॅम हे ओसंडून वाहत आहेत. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना याठिकाणी येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजमाची पॉईंट, सनसेट पॉईंट यासह इतर पर्यटनस्थळे पर्यटकांनाविना ओस पडली आहेत. यावर्षी 15 ऑगस्टला पोलिसांची या भागावर करडी नजर होती. पर्यटकांनी याठिकाणी येऊ नये असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला होता.
दरम्यान, गेल्या वर्षी याच दिवशी 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर, एकूण 5 हजार 69 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत लोणावळ्यात झालेला पाऊस कमी आहे.