पुणे - लोणावळा परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले भुशी धरण परिसर यंदा पर्यटकांविना निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षी भुशी धरणावर हजारो पर्यटकांची गर्दी असते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुशी धरणासह इतर पर्यटनस्थळी येण्यास जिल्हाधिकाराऱ्यांनी पर्यटकांना मज्जाव केला आहे.
दरवर्षी भुशी धरण पर्यटकांनी फुलून जाते. मात्र, यंदा भुशी धरणाचा परिसर निर्मनुष्य दिसत आहे. दाट धुक्यात हरवणारे भुशी धरण पर्यटकांना भुरळ घालते. तर पायऱ्यांवरून ओसंडून वाहणारे पाणी पर्यटकांचा आनंद द्विगुणित करत असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे लोणावळ्यातील प्रत्येक पर्यटनस्थळ ओस पडले आहे. यावर्षी लोणावळा परिसरातील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार नाही.
अनेकांवर गुन्हे दाखल..
कोरोनामुळे बंदी करण्यात आली असूनही, काही हौशी पर्यटक नियम झुगारून येत आहेत. परंतु त्यांच्यावर लोणावळा पोलीस करडी नजर ठेवून असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेषत: शनिवार आणि रविवारी दरवर्षी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत असतात. यंदा मात्र पर्यटकांचा हिरमोड झाला असून त्यांना या ठिकाणी येता येणार नाही.
हेही वाचा - भुशी डॅम परिसरात नियमांची पायमल्ली, ४० पर्यटकांवर गुन्हे दाखल