पुणे - पीककर्ज दोन लाखांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याने, ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपचे गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्जमाफी उधारीवर असल्याचे ते म्हणाले.
राजगुरूनगर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्जमाफीच्या बजेटसाठीची तरतूद पुरवणी यादीत करता आली असती. मात्र, ते न करता सरकारने फक्त घोषणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दोन लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या एकाही शेतकऱ्याला याचा फायदा होणार नसून, शेतकऱ्यांना मार्च मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाट पाहावी लागणार आहे, असे शरद बुट्टे-पाटील म्हणाले.
हेही वाचा - 'उद्धव साहेब... हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले तुम्हाला फसवतायत'
सरसकट कर्जमाफी दिली जाणार अशी घोषणा करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात या सरकारने दोन लाखांची मर्यादा लावल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कर्जमाफीला वेळ लागणार असून यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असे ते म्हणाले.