पुणे - जुन्नर तालुक्यातील खोडद येथे नर जातीचा 7 ते 8 वर्षीय बिबट्या विहिरीत पडल्याची घटना आज दुपारी समोर आली. स्थानिक नागरिक व वनविभागाने अथक प्रयत्नांनंतर पिंजरा लावून बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. बिबट्या भक्षाच्या मागे धावत असताना विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
खोडद येथील शेतकरी सिताराम संतू थोरात यांच्या मळ्यातील विहिरीत बिबट्या मोटारीच्या पाईपाला पकडून बसला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाने बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढले आहे. विहिरीतून बाहेर काढलेल्या नर जातीच्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या ऊस तोडणी झाल्याने बिबट्यांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न आहे. अशात जुन्नर परिसरात विहिरींना कठडे नसल्याने बिबट शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना विहिरीत पडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे, विहिरींना संरक्षण भिंती बांधण्याची गरज असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.