जुन्नर - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धनगरवाडी गावात रमेश दगडू शेळके यांच्या कठडे नसलेल्या विहीरीत मध्यरात्रीच्या सुमारास दीड वर्ष वयाचा मादी बिबट्या पडून मृत्यू झाला आहे.
'विहिरीच्या जवळ मेंढपाळांचा कळप होता. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने बिबट्या या परिसरात आला असावा आणि तो विहिरीत पडला असावा. विहिरीत पडल्यानंतर बचावासाठी विहीरीतील एका नायलॉन पिशवीकडे बिबट्या झेपावला. मात्र, पिशवीमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला असावा', असा प्राथमिक अंदाज नारायणगाव वन विभागाच्या वनरक्षक मनीषा काळे यांनी व्यक्त केला.
आज (28 एप्रिल) सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी ग्रामस्थ व वनकर्मचारी यांच्या मदतीने वनरक्षक मनीषा काळे, वनकर्मचारी कल्याणी पोटवडे, श्रीपती नेहरकर, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके आणि ग्रामस्थांनी हा मृत बिबट्या विहिरीच्या बाहेर काढला.
दरम्यान, उन्हाळा वाढल्याने पाण्याच्या व भक्षाच्या शोधात बिबटे रात्रीची भटकंती करत आहेत. अशा पद्धतीने अपघात होऊन बिबटे मृत पावत आहेत. त्यामुळे बिबट्यांचा मृत्यू होत असल्याने प्राणिमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - ठाण्यातील प्राईम क्रिटी केअर रुग्णालयाला भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा - 'ईटीव्ही बालभारत' लॉंच, रोमांचक कार्टून शोज आता आपल्या मायबोलीत